॥ कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥

 

दोन फंड घराण्यांचे औषध निर्माण (फार्मा) आणि आरोग्य निगा (हेल्थकेयर) क्षेत्रातील फंड नुकतेच येऊन गेले. या दोन फंडांपैकी  एका फंडाची या सदरातून गुंतवणुकीची शिफारस केली होती. औषध निर्माण आणि आरोग्य निगा क्षेत्रांत एक अंधुक सीमारेषा आहे.आरोग्य निगा क्षेत्र हे अधिक विस्तृत असून आरोग्याशी निगडीत निदान पूर्व चाचण्या करणारी केंद्रे  रुग्णालये, औषध विषयक वैद्यकीय चाचण्या (क्लिनिकल ट्रायल), आरोग्य विमा, यांचा समावेश होतो. भारतातील आरोग्य निदान क्षेत्राचा विचार केला तर सर्वसाधारण ६० टक्के व्यवसाय जानेरिक ड्रग, ३० टक्के व्यवसाय ब्रँडेड ड्रग, आणि १० टक्के अन्य सेवा असे व्यवसायाचे विभाजन करता येईल. एकूण औषध विक्री पैकी ४० टक्के औषधे अमेरिकेत निर्यात होतात. अमेरिका ही भारतीय औषध निर्मितीची मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेची व्यापारविषयक धोरणे औषध निर्मात्यांना अडचणींची ठरत आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी (एफडीए कमिशनर) डॉ. स्कॉट गॉएटेब यांची मे २०१७ मध्ये नियुक्ती झाली. डॉ. स्कॉट गॉएटेब यांची ओळख एक उदार मतवादी अशी असून अमेरिकेत आरोग्य सेवा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणे गरजेचे आहे अशी त्यांची धारण असून आरोग्य सेवांचे दर कमी करण्यासाठी औषध वितरणाचे परवाने मोठ्या संख्येने देणे गरजेचे आहे या मताचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. डॉ. स्कॉट गॉएटेब यांचे त्यांच्या ब्लॉगवरचे लिखाण आणि वेगवेगळ्या प्रसंगी केलेली भाषणे वाचली असता त्यांची विचारधारा लक्षात येते. घसरलेल्या रुपयामुळे भारतीय औषधे अमेरिकेत आयात करणे स्वस्त झाल्यामुळे व डॉ. स्कॉट गॉएटेब यांची व्यावसाय  पुरक धोरणे भारतीय औषध कंपन्यांना नजीकच्या काळात फायद्याची ठरणार आहेत. या दोन कारणांनी लाभार्थी ठरलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करणारा रिलायंस फार्मा फंड असल्याने या फंडात नव्याने गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मागील दोन वर्षांपासून रिलायंस फार्मा फंडाने निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेवर भर असलेल्या कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश केला आहे. या कंपन्यांनी औषध निर्मितीतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यात गुंतवणूक केली. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून अमेरिकेत एखादे औषध विकण्यासाठी मिळणारी परवानगी ही विशिष्ट कारखान्यात (साईट अॅप्रुव्हल) तयार केलेल्या औषधाला असते. या नंतर विशिष्ट उत्पादनाला (प्रोडक्ट अॅप्रुव्हल) अमेरिकेत औषध वितरण करण्याची अनुमती मिळते.  मागील तीन चार वर्षात औषध निर्माण कंपन्यांनी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रमाणित निर्मिती प्रक्रियेतील अटींत कोणतीही त्रुटी राहणार नाही ही दक्षता बाळगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. या खर्चाची फळे मिळण्याची वेळ आली आहे असे वाटते. भारतातून आफ्रिका, पूर्व युरोप, दक्षिण अमेरिकेतील काही देशांना निर्यात होते. मागील दोन वर्षे या राष्ट्रांच्या चलनाच्या तुलनेत रुपया स्थिर राहिल्याने या देशांना भारतातून आयात करणे महाग झाले होते. आता या देशांच्या चालानासापेक्ष रुपयाचे मूल्य कमी झाले. साहजिक या देशांकडून भारतातील औषधांची मागणी वाढेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारातातील लोकांच्या आरोग्याचे वर्णन करायचे तर विकसित देशातील नागरिकांचे आजार आणि विकसनशील देशातील उत्पन्न असे करावे लागेल. मधुमेह उच्च रक्तदाब हृदयाच्या आणि मूत्रपिंडाच्या आजारांना काबूत ठेवण्यासाठी दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. या रोगांचे निदान हे  आजार गंभीर अवस्थेला पोहोचण्यापूर्वी होणे गरजेचे असते आणि निदान पश्चात औषध उपचारांना मिळणारा प्रतिसाद समजण्यासाठी वेळोवेळी चाचण्या गरजेच्या झाल्या आहेत. परिणामी या चाचण्या करणरे व्यवसाय (डायग्नोस्टिक सेन्टर्स) फोफावले. साहजिकच आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास एक नवीन पर्याय उपलब्ध झाला. शैलेश राज भान हे या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची आहेत. या फंडासोबत रिलायंस फंड घराण्याच्या  अन्य चार फंडांच्या निधी व्यवस्थापनाची धुरा ते यशस्वीरित्या सांभाळत आहेत. या सकारात्मक घडामोडींचा फायदा निधी व्यवस्थापकांनी घेत ज्या गुंतवणुका केल्या आहेत त्याचे परिणाम दिसण्यास दोन तीन वर्षे लागतील. हा सेक्टरल फंड असल्याने पाच ते सात वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा एक पर्याय उपलब्ध असून आपल्या जोखीमांकाला साजेसा वाटल्यास रिलायंस फार्मा फंडाचा गुंतवणुकीत समावेश करावा.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top