नभी उमटे इंद्रधनू!

 

मागील आठवडय़ात जून महिन्यातील औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहीर झाले. वार्षिक ७ टक्के वृद्धिदर राखत औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने सातत्याने पाचव्या महिन्यात वाढ दर्शविली. मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ १.९ टक्के होती. निश्चलनीकरणाने बाधित औद्योगिक उत्पादन, सद्य आर्थिक वर्षांत सुधारणा दाखवत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीमध्ये त्याने ५.२ टक्के वाढीची नोंद केली. या वाढीत विद्युतनिर्मिती, पोलाद उत्पादन, सिमेंट उत्पादन, भांडवली वस्तू यांचे मोठे योगदान राहिले आहे. या तिन्ही गोष्टी अंतिम उत्पादने नसून यांचा उपयोग विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी होतो. भांडवली वस्तूंच्या उत्पादनाने ९.६ टक्के वाढ नोंदविली ही बाब विशेष दखल घेण्याजोगी आहे.

निवडक कृषी उत्पादनांच्या आधारभूत किमतीत सरकारने वाढ केल्यामुळे तसेच लागोपाठच्या तिसऱ्या वर्षी आजपर्यंतचे पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक असल्यामुळे सद्य आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत औद्योगिक उत्पादन निर्देशांक ७.४ टक्क्य़ांदरम्यान वाढ नोंदवेल, अशी अपेक्षा वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट बँकांच्या आर्थिक अहवालात व्यक्त झाली आहे. औद्योगिक उत्पादनात सहभाग असलेल्या मुख्य उत्पादनांना साहाय्यभूत असणाऱ्या पूरक उत्पादनांचे निर्माते अर्थात मिड कॅप समभाग या वाढीचे अप्रत्यक्ष लाभार्थी असतील याबद्दल पोर्टफोलिओ व्यवस्थापकांच्या मनात एकवाक्यता दिसून येते.

‘एस अँड पी बीएसई मिड कॅप’ निर्देशांकाची ३० एप्रिलपासून १७ हजाराच्या पातळीवरून मे ते जुलैदरम्यान मोठी घसरण झाल्याने सध्याचे मूल्यांकन मिड कॅप समभागांचा नव्याने विचार करावा असे आहे. या पाश्र्वभूमीवर सुंदरम मिड कॅप फंडाची आजची शिफारस आहे. गुंतवणुकीतील जोखीम स्वीकारून भांडवली वृद्धी अनुभवण्याची इच्छा असलेल्या धाडसी गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस लक्षात घेण्यासारखी आहे.

मिड कॅप फंड असूनदेखील बाजाराच्या तेजी-मंदी काळातील कामगिरीत सातत्य राखलेला सुंदरम मिड कॅप फंड हा मिड कॅप फंड गटात एक भरवशाचा फंड आहे. मागील १० वर्षांतील ५ हजार रुपयांच्या नियोजनबद्ध (एसआयपी) गुंतवणुकीच्या सहा लाखांचे १७ ऑगस्ट २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार गुंतवणूक मूल्य १९.१७ लाख रुपये झाले आहे.

पाच वर्षांपूर्वी सुंदरम मिड कॅप फंडात गुंतविलेल्या १ लाखाचे १७ ऑगस्ट २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार गुंतवणूक मूल्य ५.१२ लाख रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर १७.७५ टक्के आहे. एसआयपी तसेच एकरकमी गुंतवणुकीवर १७ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा राखल्याने सुंदरम मिड कॅप फंड हा मिड कॅप फंड गटात सर्वमान्य फंड आहे.

या कारणाने हा फंड सुंदरम फंड घराण्याची ओळख बनून राहिला आहे. फंडांच्या सुसूत्रीकरणामुळे सुंदरम सिलेक्ट मिड कॅपचा सुंदरम मिड कॅप असा नामबदल होण्याबरोबरच या फंडाच्या गुंतवणूक परिघात किरकोळ बदल झाले आहेत. मानदंड निर्देशांक, निधी व्यवस्थापक यांच्यात मात्र बदल झालेले नाहीत. फंडाचे व्यवस्थापन नोव्हेंबर २०१२ पर्यंत सतीश रामनाथन यांच्याकडे होते. नोव्हेंबर २०१२ पासून फंड घराण्याने निधी व्यवस्थापनाची धुरा एस. कृष्णकुमार यांच्याकडे सोपवली. फंड जगतात कृष्णकुमार यांची ओळख मिड कॅपचे किमयागार (‘मिड कॅप विझार्ड’) अशी आहे. उत्तम व्यवस्थापन आणि संशोधनाअंती निकषपात्र असलेल्या समभागांचा गुंतवणुकीत समावेश होतो. समभागांची निवड करताना मूल्यांकनावर कटाक्ष असला तरी आवश्यक तेथे मूल्यांकनाशी निगडित जोखीम घेण्यास कृष्णकुमार कचरत नाहीत. गुंतवणुकीत मागील वर्षभरात असलेला लार्ज कॅप समभागांचा समावेश फंडाच्या सुसूत्रीकरणानंतर वगळून हा फंड केवळ मिड कॅप गुंतवणूक असलेला फंड असेल. फंडाच्या गुंतवणुकीचा भर आर्थिक आवर्तनाशी निगडित समभाग आणि उपभोग्य वस्तू यांच्यावर आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक वाहन आणि वाहनपूरक उद्योग, बिगरबँकिंग कंपन्या, अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू, वैयक्तिक वापराच्या वस्तू या उद्योगांत आहे.

मागील दोन वर्षांत मिड कॅप फंडात गुंतविलेल्यांची गत ‘घी देखा मगर बडगा नहीं देखा’ अशी झाली आहे. मिड कॅप फंड गुंतवणूककितीही आकर्षक वाटली तरी मंदीच्या कालावधीत मोठे नुकसान सोसण्याची मानसिक तयारी गुंतवणूकदारांनी ठेवणे आवश्यक असते. ज्यांना समभाग गुंतवणुकीतील आणि विशेषत: मिड कॅप गुंतवणुकीतील जोखीम स्वीकारून भांडवली वृद्धी मिळविण्याची इच्छा आहे, अशा गुंतवणूकदारांनी या फंडाचा समावेश एकरकमी गुंतवणुकीपेक्षा नियोजनबद्ध गुंतवणुकीसाठी करावा.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top