भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने म्युच्युअल फंडांच्या सुसुत्रीकारणाबाबत एक संपूर्ण परिपत्रक काढले. गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार विविध पर्यायांचे मूल्यमापन करू शकतील हा या परिपत्रकाचा उद्देश होता.  फंड वर्गीकरणाच्या निर्णयानुसार, इक्विटी फंड १० गटात विभागले आहेत. लार्ज अँण्ड मिडकॅप हा एक फंड प्रकार असून जुलै २०२३ अखेरीस या फंड गटाची मालमात्त १.५६ लाख कोटी होती.  या फंडाच्या गुंतवणुकीत एकूण मालमत्तेपैकी ३५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप आणि ३५ टक्के गुंतवणूक मिडकॅप मध्ये करणे आवश्यक आहे. लार्ज-कॅप्स पोर्टफोलिओला स्थैर्य तर मिड-कॅप वृद्धी प्रदान करतात.

टाटा लार्ज अँण्ड मिडकॅप फंड हा एक इक्विटी म्युच्युअल फंड असून या फंडाच्या गुंतवणुकीचा उद्देश लार्ज अँण्ड मिडकॅप ( बाजार भांडवला नुसार पहिल्या २५० कंपन्या) कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून नियमित उत्पन्न आणि भांडवली वृद्धी करणे हा आहे. चंद्रप्रकाश पडियार हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड व्यवस्थापित करण्यासाठी निधी व्यवस्थापकांच्या मदतीला एक तज्ञ समभाग विश्लेषकांचा चमू सक्रिय संशोधन करून कंपन्या निवडतात. बदलणारा आर्थिक कल किंवा कंपन्यांच्या व्यवसायातील सकारात्मक बदलाचा फायदा अपेक्षित असलेल्या कंपन्या शोधण्यावर फंडाचा भर आहे.

निधी व्यवस्थापक आणि व्यवस्थापन पद्धत:

ज्या कंपन्या त्यांचा मार्केट शेअर वाढवत आहेत, ज्याचा परिणाम कंपन्यांची नफा क्षमता वाढण्यावर होईल अशा कंपन्यांना निधी व्यवस्थापक पसंती देतात. कंपन्यांची नफा क्षमता वाढल्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या  गुंतवणूकीवर भविष्यात अधिक नफा मिळेल हा या मागचा उद्देश असतो. निधी व्यवस्थापक आणि विश्लेषकांचा चमू बाजारातील बदलांचा सतत मागोवा घेत असतो. जेव्हा त्यांना चांगली संधी दिसते तेव्हा त्या कंपनीचा गुंतवणुकीत समावेश होतो. सुरवातीला लहान मात्रेत खरेदी करून भविष्यात गुंतवणुकीची मात्रा वाढविली जाते. जुलै महिन्यांत निधी व्यवस्थापकांनी एचडीएफसी असेट मॅनेजमेंट (२.४४ %) आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनॅनशिअल सर्व्हिसेस (१.८७ %) या दोन मिडकॅप कंपन्यांचा समावेश केला आहे तर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यातील विलीनीकरणामुळे  एचडीएफसी बँकेची मात्र (६.४७  % वरून ८.८० %) वाढली. ते प्रत्येक कंपनीच्या संभाव्यतेचे विश्लेषण करण्यासाठी आणि प्रत्येक कंपनीच्या गुणवत्तेवर आधारित गुंतवणूक वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जातो. एकंदरीत, टाटा लार्ज अँड मिड कॅप फंड हा एक सक्रियपणे व्यवस्थापित होणारा फंड आहे ज्याचा उद्देश लार्ज आणि मिडकॅप कंपन्यात गुंतवणूकीच्या संधींचा लाभ घेणे हा आहे.

टाटा लार्ज आणि मिड कॅप फंडाचे गुंतवणूक तत्वज्ञान काही प्रमुख तत्त्वांभोवती फिरते. सर्वप्रथम, फंडाचे उद्दिष्ट पोर्टफोलिओमध्ये मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी व्यवसाय वृद्धी (कंपाऊडिंग) असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून लक्षणीय परतावा मिळवण्याचे आहे. ही रणनीती फंडाला गुंतवणूक असलेल्या समभागांच्या किंमतील संभाव्य वाढ आणि संपत्ती निर्मितीचा फायदा घेण्यासाठी यशस्वी ठरली आहे. हा फंड समभाग केंद्रित पोर्टफोलिओ धोरणाचा अवलंब करतो, ज्यामध्ये साधारणपणे २५ ते ३५ कंपन्यांचा समावेश असतो. असतात. काही निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून, वृद्धी आणि भांडवली लाभाची उच्च क्षमता असलेल्या कंपन्यांची काळजीपूर्वक निवड केली जाते.  गुंतवणुकीच्या निर्णयांमध्‍ये दृश्‍यमानता आणि खात्री याला निधी व्यवस्थापक महत्त्व देतात.  दुसऱ्या शब्दात सांगायचे तर गुंतवणूक संशोधकांचा चमू ट्रिगर किंवा कॅटॅलिस्ट्सचा शोध घेतात ज्यांची ओळख बाजाराला अद्याप पटलेली नाही. असे समभाग ‘ग्रोथ अॅट रिझनेबल प्राईस’  म्हणून ओळखले जातात. टाटा लार्ज अँण्ड मिड कॅप फंड गुंतवणुकीला बेंचमार्क इंडेक्सपुरते मर्यादित ठेवत नाही. बेंचमार्कच्या बाहेरील (निर्देशांकात समाविष्ट नसलेल्या) कंपन्यांना निधी व्यवस्थापक एका विषिष्ठ मर्यादेपर्यंत गुंतवणुकीत स्थान देतात. ही लवचिकता फंडाला बेंचमार्कपुरती मर्यादित न ठेवता कंपन्यांच्या गुणवत्तेवर आधारित गुंतवणूक करण्यास अनुमती देते. याव्यतिरिक्त, बाजार नियामकाने सिक्युरिटीज अँण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) निश्चित केलेल्या मर्यादेचे भान राखत फंडाने विविध बाजार भांडवलांमध्ये गुंतवणूक केली आहे. ही लवचिकता निधी व्यवस्थापकाला बाजारातील परिस्थिती आणि संभाव्य परताव्याचे गणित मूल्यांकनाच्या आधारे लार्ज-कॅप आणि मिड-कॅप अशा दोन्ही समभागांमधील संधींचा फायदा घेण्यास सक्षम करते.

सारांशाने सांगायचे तर टाटा लार्ज अँड मिड कॅप फंड गुंतवणुकीच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करतो जे एक केंद्रित पोर्टफोलिओ ज्यात कंपाऊंडींगची क्षमता  ट्रिगर्समधील दृश्यमानता आणि बेंचमार्क अज्ञेयवादी रणनीती यावर जोर देते. ही तत्त्वे आकर्षक गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी आणि दीर्घकालीन परताव्याच्या उद्देशाने फंडाच्या निर्णय प्रक्रियेला मार्गदर्शन करतात.

पोर्टफोलिओ रचना

पोर्टफोलिओचा ९० टक्के लार्ज अँड मिड कॅप कंपन्यात  गुंतविलेला असून उर्वरित९ टक्के स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतविलेला आहे. क्षेत्रीय विविधता ही कोणत्याही पोर्टफोलिओच्या स्थैर्याची  गुरुकिल्ली आहे. या फंडाच्या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा वित्तीय सेवांत गुंतविलेला असून एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक,  स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एलआयसी हौसिंग फायनांस हे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. त्याखालोखाल भांडवलीवस्तू (कॅपिटल गुड्स) एफएमसीजी, तेल आणि वायू, वाहन वाहन पूरक उत्पादने यांचा समावेश आहे. 

आघाडीची गुंतवणूक क्षेत्रे                              %

वित्तीय सेवा                                              २७.७८

भांडवली वस्तू                                           १०.२१            

एफएमसीजी                                              ८.७९

तेल आणि वायू                                           ६.८६

वाहन आणि वाहन पूरक उत्पादने                 ६.१४

माहिती तंत्रज्ञान                                         ५.४६

आरोग्यसेवा                                              ५.३८

बांधकाम                                                  ४.३९

ग्राहक सेवा                                               ४.२१

रसायने                                                    ३.४० 

फंडाच्या आघाडीच्या १० गुंतवणुका विविध उद्योगांचे प्रतिनिधित्व करतात. आघाडीच्या १० गुंतवणुकीत क्षेत्रांच्या दृष्टीने विचार केल्यास  भांडवली वस्तू (कमिन्स इंडीया), एफएमसीजी (वरुण ब्रिवरेजेस) वाहन पूरक उद्योग (सुंदरम फास्टनर्स)  टेलीकॉम (भारती एअरटेल) या कंपन्यांचा समावेश आहे.  ‘टॉप टेन होल्डींज’मध्ये  बहुतांश कंपन्या  लार्ज कॅप किंवा मिड कॅप घाटणीच्या आहेत. या सुनियोजित मालमत्ता विभाजनाचा फंडाला चांगला फायदा झाला असल्याचे दिसत आहे. कारण भारतीय बँकिंग क्षेत्र सुदृढ ताळेबंद, घटलेल्या अनुत्पादित कर्जांचे प्रमाण बँकिंग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या पथ्यावर पडले आहे.  

कंपनी                                         गुंतवणुकीची टक्केवारी

एचडीएफसी बँक                            ८.८०

आयसीआयसीआय  बँक                  ६.७७

वरुण बेव्हरेजेस                              ५.७३

रिलायन्स इंडस्ट्रीज                          ५.५०

स्टेट बँक ऑफ इंडिया                     ४.८०

आयडीएफसी फर्स्ट बँक                  ४.४५

सुंदरमा फास्टनर्स                           ३.७८

भारती एअरटेल                              ३.१९

आदित्य बिर्ला फॅशन                       २.७८

कमिन्स इंडिया                               २.५५ 

फंडाची कामगिरी

टाटा लार्ज अँड मिडकॅप फंडाने बाजाराच्या विविध टप्प्यात प्रभावी एसआयपी परतावा दिला आहे, ज्यामुळे या फंडात गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करण्याची क्षमता दिसून येते.

कालावधी वार्षिक परतावा मुद्दल    बाजार मूल्य
१ वर्षे    २४.३०   १२००० १३५२७
२ वर्षे       १७.५४    २४००० २८५००
३ वर्षे        १९.५७ ३६००० ४७९६०
५ वर्षे        १९.२४ ६०००० ९६८६५
१० वर्षे   १५.३० १२००००   २६७३६८

विविध कालावधीतील परताव्याचा दर आकर्षक आणि सातत्यपूर्ण असल्याने बाजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यात संपत्तीनिर्मितीकरण्याची फंडाची क्षमता दर्शवतात. ज्या गुंतवणूकदारांनी नियोजनबद्ध गुंतवणूक (एसआयपी) पद्धतीने फंडामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांनी त्याच्या गुंतवणूक धोरणाचा आणि कंपन्यांची निवड करण्याच्या कौशल्याचा फायदा झाला असल्याचे दिसते. प्रदीर्घ कालावधीत फंडातील गुंतवणुकीने भरपूर संपत्ती निर्माण केली आहे.

सातत्य आणि दोन आकड्यातील भांडवल वृद्धीदर देणारा हा फंड गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मितीचा एक राज मार्ग आहे. फंडाने चक्रवाढ मार्गाने संपत्तीची निर्मिती केली असल्याने प्रदीर्घ कालावधीत अव्वल परतावा देण्याची क्षमता सिद्ध केली असल्याने गुंतवणूकदार या फंडाचा दीर्घकालीन एसआयपी साठी विचार करू शकतात. 

वैधानिक इशारा : म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती पत्रक सखोल अभ्यासा.

गुंतवणूक संधिंबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
+91 97024 90900

Scroll to Top