भारतातील सर्वात जुन्या मिडकॅप फंडाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फंड घराण्याने निवडक विश्लेषकांना निधी व्यवस्थापकांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आमंत्रित केले होते. कोठारी पायोनिअर प्रायमा (सध्याचे नांव फ्राँकलीन इंडिया प्रायमा) या नावाने हा फंड स्मॉल अँण्ड मिडकॅप फंड म्हणून १ डिसेंबर १९९३ रोजी अस्तित्वात आला. या फंडात १ जानेवारे १९९४ ते १ मार्च २०२४ दरम्यान ३६३ महिन्यांत दरमहा १००० रुपयांची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ३६३००० हजाराचे २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ नुसार १८,६१९८८ रुपये झाले असून या गुंतवणुकीवर २०.५३ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. फंडाच्या एनएफओ मध्ये १ डिसेंबर २९९३ रोजी गुंतविलेल्या १००० रुपयांचे २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ नुसार २,१०७५० झाले असून १९.३५ टक्के परतावा मिळाला आहे. याचा अर्थ पैसे साडेतीन वर्षात पैसे दुप्पट झाले आहेत. ज्या वेळी हा एनएफओआला तेव्हा कोठारी पायोनियर ही म्युच्युअल फंड उद्योगात अपरिचित नाममुद्रा होती. त्या काळात म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण मालमत्ते पैकी ८० टक्के मालमत्ता एकाच (युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) फंड घराण्याकडे होती. आज आघाडीच्या  १० फंड घराण्यांकडे म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकत्रित मालमत्तेपैकी ८० टक्के मालमत्ता आहे. युटीआयची घसरण पहिल्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर झाली आहे. मागील तिमाहीत युटीआयने मालमत्ता क्रमवारीत अॅक्सीस म्युच्युअल फंडाला मागे टाकल आठव्या क्रमांकावरून सातवे स्थान पटकावले. त्यावेळेस म्युच्युअल फंड उद्योगात युटीआय,  कॅनरा बँक, बीओआय, आणि एसबीआय, सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी प्रवर्तित केलेल्या आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांचा दबदबा होता. त्यावेळी कॅनस्टार,बीओआय डबल स्क्वेअर प्लस आणि अत्यंत लोकप्रिय ‘युनिट स्कीम १९६४’ सारख्या खात्रीशीर परतावा देणाऱ्या फंडांशी स्पर्धा करतांना ‘मार्केट-लिंक्ड प्लॅन्स’ची दमछाक होत असे. अशा पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या कोठारी पायोनिअर प्रायमा या फंडास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एसआयपी संस्कृती त्या वेळी अस्तित्वात नव्हती, ‘इसीएस’ हा प्रकार नव्हता  आणि दरमहा गुंतवणूक करण्यासाठी अतिरिक्त चेकबुकची आवश्यकता होती. हे अतिरिक्त चेकबुक  घेण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांची मनधरणी करायला लागायची. साहजिकच फंडाच्या पहिल्या एनएव्हीपासून एसआयपी करणारा गुंतवणूकदार शोधूनही सापडायचा नाही. त्यामुळे कोठारी पायोनियर प्रायमा आणि ब्लूचीप (लार्जकॅप) फंडांनी केलेल्या संपत्ती निर्मितीतून गुंतवणूकदारांनी धडे शिकले पाहिजेत.

पहिला धडा हा की केवळ मोठ्या नावाच्या परिचित नाममुद्रा चांगली कामगिरी करतात असे नाही तर कठोर ‘इंवेस्टमेंट प्रोसेस’ असलेले फंड संपत्तीची निर्मिती करू शकतात.

दुसरा धडा निश्चित परताव्याच्या मागे न लागता, दीर्घकालीन गुंतवणुकीतूनच संपत्ती निर्मिती करता येते.

तिसरा धडा असा की बाजारातील चढउतारांचा फ्रँकलिन इंडियाच्या फंडांच्या कामगिरीवर परिणाम झाला. गेल्या ३० वर्षात या फंडाने बरेच चढ-उतार अनुभवले, तीन प्रदीर्घ काळ चाललेल्या मंदी, फंडाच्या प्रायोजकांमध्ये बदल, वेळोवेळी फंडाच्या गुंतवणूक चौकटीतील बदल (स्मॉल अँण्ड मिडकॅप कडून मिडकॅप फंड म्हणून मिळालेली ओळख)  या काळात ७ निधी व्यवस्थापकांनी हा फंड व्यवस्थापित केला. तरीही ज्या गुंतवणूकदारांनी या कमी कामगिरीचे शब्द. योजनांचा बारकाईने मागोवा घेतल्याने गुंतवणूकदारांनी या घटनांकडे दुर्लक्ष करून आपली गुंतवणूक राखून ठेवली त्यांना या गुंतवणुकीने भरघोस संपत्ती निर्मितीचे माप पदरात टाकले.

निप्पॉन इंडिया ग्रोथ नंतर चार आकडी एनएव्ही गाठणारा हा दुसरा फंड ठरला आहे. दोन वर्षाच्या फरकाने अस्तित्वात आलेल्या या दोन्ही फंडांनी गुंतवणूकदारांना दीर्घकाळात कधीच निराश केले नाही. या फंडाला कॅलेंडर वर्ष १९९५, १९९६ आणि १९९७ या तीन वर्षांच्या गुंतवणुकदारांना अल्प वाढ किंवा तोटा झाला. (१ ऑगस्ट १९९५ रोजी एनएव्ही रुपये १७.१७ आणि १ ऑगस्ट १९९७ रुपये १०.८८ ) याची भरपाई कॅलेंडर वर्ष १९९८, १९९९ आणि २००० या वर्षात केली. (१ डिसेंबर १९९७ रुपये ८.८० ते ३ जानेवारी २०००रोजी रुपये ३८.११) ज्यांनी ‘प्रोफिट बुकिंग’च्या नांवाखाली पैसे काढून घेतले त्यांनी पुढील २३ वर्षात ५६ पट नफा कमाविण्याची संधी गमावली. (२९ फेब्रुवारी २०२४ रेग्युलर ग्रोथ एनएव्ही रुपये २१५९.७३.) हा फंड ३० वर्षापैकी ८ वर्षे ‘टॉप क्वारटाइल’मध्ये  ११ वर्षे ‘अपर मिडल क्वारटाइल’मध्ये ४ वर्षे ‘लोवर मिडल क्वारटाइलमध्ये, ४ वर्षे ‘मिडल क्वारटाइल’मध्ये आणि ३ वर्षे बॉटम क्वारटाइल’मध्ये राहिला.

एकंदरीत, तीन कारणांनी फंडातून बाहेत पडायला हरकत नसते. पहिले कारण दोन वर्षांपेक्षा जास्त काळ फंडाची मानदंड सापेक्ष खराब कामगिरी असेल तर, तुम्ही एखाद्या चांगल्या फंडात ‘स्विच’ करू शकता. तुमचा जोखीमांकाशी विपरीत गुंतवणूक असेल तर आणि तुमचे वित्तीय ध्येय साध्य करण्यास तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी असेल तरच इक्विटी फंडातून नफा काढून घेणे योग्य असते. फंडाने कधीही तीन तिमाहीपेक्षा अधिक कालावधीत मानदंड सापेक्ष खराब कामगिरी केली नाही. या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक जानकीरामन रेंगाराजू संदीप मनम आणि अखिल कल्लुरी हे आहेत. फ्रँकलिन टेम्पलटनचे एक दिग्गज निधी व्यवस्थापक केएन शिवसुब्रमण्यन यांनी या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा प्रदीर्घ काळ वाहिली. या फंडाच्या तसेच फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडाच्या लखलखीत कामगिरीचे श्रेय शिवसुब्रमण्यम त्यांना जाते. जानकीरामन यांना स्मॉल आणि मिडकॅप क्षेत्रातील संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते त्यांच्या पोर्टफोलिओसाठी आकर्षक मूल्यमापनांसह उच्च वाढीची (हाय ग्रोथ) क्षमता असणारे दर्जेदार समभाग निवडण्यात माहीर आहेत. आर. जानकीरामन यांना आता सीआयओ इमर्जिंग मार्केट इक्विटीज-इंडिया या पदी पदोन्नती देण्यात आली आहे. ते २००७ पासून पासून फ्राँकलीन इंडियाच्या गुंतवणूक चमूचे भाग आहेत. त्यांची फंड जगतात मिड- आणि स्मॉल-कॅप विशेषज्ञ अशी आहे. त्यांना २० वर्षांपेक्षा जास्त उद्योगाचा अनुभव आहे आणि त्यांनी फ्राँकलीन इंडियाचे माजी सीआयओ (आणि सुंदरमचे विद्यमान सीईओ) आनंद राधाकृष्णन यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केले आहे. त्यांच्या पद्दोनतीचा निर्णय गुंतवणूकदारांना फायद्याचा य्हारेल या बद्दल शंका नाही. फेब्रुवारी २०११ पासून ते फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंडाचे निधी व्यवस्थापन करत आहेत, अखिल कल्लुरी यांची सप्टेंबर २०२२ पासून सहनिधी व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली आहे.

डिसेंबर १९९३ मध्ये अस्तित्वात आलेल्या या फंडाने मागील महिन्यात १० हजार कोटी मालमत्तेचा टप्पा ओलांडला. या फंडाला तीस वर्षाच्या संपत्ती निर्मितीची समृद्ध परंपरा आहे. हा फंड बाजारातील जोखीम घेण्यास न काचरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य साधन आहे. दीर्घ कालावधीत समृद्धी निर्माण करणाऱ्या फंडांच्या यादीत हा फंड आघाडीवर आहे. साहजिकच सेवानिवृत्ती सारख्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी हा फंड अतिशय योग्य फंड आहे. तथापि, नव्याने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत मोठ्या अस्थिरतेच्या तयारीने या फंडात गुंतवणूक कारावी.

आर जानकीरामन

अखिल कल्लुरी 

Scroll to Top